गर्भावस्थेत प्रत्येक महिन्यात गर्भाची होणारी वाढ Fetal Growth & Development Per Month
आई होणे हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुखद आणि महत्वाचा टप्पा असतो. मासिक पाळी चुकल्यानंतर पुढील दोन आठवड्यांमध्ये कधीही गर्भधारणा होण्याची शक्यता असते. गर्भधारणा झाल्यानंतर आईच्या गर्भामध्ये होणारी बाळाची वाढ आणि विकास योग्य पद्धतीने होतो आहे का , कसा होतो आहे हे माहित असणे हि तेवढेच आवश्यक असते. गरोदरपणात प्रत्येक महिन्यामध्ये बाळाची वाढ किती आणि कशी होते हे या लेखामध्ये सविस्तर सांगितले आहे.
गरोदरपणात गर्भाचे वजन वाढवण्यासाठी उपाय How to increase baby weight during pregnancy?

गरोदरपणाचा पहिला महिना First Month Of Pregnancy
मासिक पाळी चुकल्यानंतर पहिल्या आठवड्यातच तुम्ही गरोदर आहेत हे समजते. या काळामध्ये गर्भ आईच्या गर्भाशयामध्ये रुजत असतो. ज्यामुळे गर्भपेशींचे वर्गीकरण दुप्पट गतीने होत असते. योग्य ते पोषण मिळत जाऊन गर्भाचा वाढ आणि विकास सुरु होतो. पहिल्या महिन्यात गर्भाचा आकार खूप छोटा असतो म्हणजे साधारणपणे सफरचंदाच्या बी एवढा म्हणजेच ०.१३ इंच एवढा असतो.
हळू हळू या गर्भाच्या आसपास गर्भजल पिशवी (ऍम्नीऑटिक सॅक ) म्हणजेच गर्भाचे सुरक्षा कवच तयार होण्यास सुरुवात होते आणि त्यानंतर या पिशवीमध्ये गर्भजल भरू लागते. गर्भाची नाळ विकसित होते ज्याद्वारे गर्भाला लागणारे सर्व पोषण आईच्या शरीरातून गर्भाला मिळते.
सर्वात आधी गर्भाचा चेहरा म्हणजेच डोक्याकडील भाग बनण्यास सुरुवात होते. रक्तवाहिन्यांही आकार मिळायला लागतो. पहिल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत छोट्याश्या गर्भाच्या हृदयाचे ठोके सुरु होतात.
पहिल्या महिन्यामध्ये गर्भवतीने तिच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. गर्भावस्थेच्या पहिल्या महिन्यात कशी काळजी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
गरोदरपणाचा दुसरा महिना Second Month Of Pregnancy
दुसऱ्या महिन्यात बाळाची वाढ अधिक झपाट्याने होते. या काळात बाळाचे डोके, हात, पाय, बोटे, पाठीचा कणा असे महत्वाचे भाग निर्माण होत असतात. सोनोग्राफीमध्ये बाळाच्या हृदयाचे ठोकेही ऐकू येतात. दुसऱ्या महिन्यात म्हणजेच साधारणपणे ६ व्या आठवड्यात सोनोग्राफी रिपोर्टमध्ये तुम्हाला गर्भाचा आकार हा शेपूट असणाऱ्या अर्धगोलाप्रमाणे दिसेल. बाळाच्या बाह्य अवयवांप्रमाणेच बाळाचे मूत्रपिंड , फुफ्फुसे,मेंदू असे अंतर्गत अवयवही विकसित होत असतात. गर्भावस्थेच्या दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाचे प्रजनन अवयव विकसित होऊ लागतात पण मुलगा कि मुलगी हे ओळखणे शक्य नसते.
गर्भावस्थेच्या दुसऱ्या महिन्यात बाळाची वाढ साधारणतः १.३ सेमी (१ इंचांपर्यंत ) एवढी झालेली असते.
गरोदरपणाचा तिसरा महिना Third Month Of Pregnancy
तिसऱ्या महिन्यात बाळाची वाढ अधिक जलद गतीने होते. तळ हातात मावेल एवढ्या या छोट्याश्या गर्भाला डोक्यावर केस व संपूर्ण अंगावर लव येऊ लागतात. बाळाच्या शरीराला आणि अवयवांना आकार यायला लागतो. तिसरा महिना संपेपर्यंत बाळाचे सर्व अवयव निर्माण होतात . बोटांच्या टोकांवर लहानसे ठसे विकसित होतात. गर्भाशयामध्ये असणाऱ्या गर्भजलामध्ये बाळ सुरक्षितपणे तंरंगत असते. गर्भामध्ये बाळ हालचाल करू लागते. पहिल्यांदाच आई होणाऱ्या मातेला हि हालचाल जाणवत नाही.
गर्भावस्थेच्या तिसऱ्या महिन्यात बाळाची वाढ साधारणतः ४ इंच एवढी झालेली असते.
पहिल्या एक ते तीन महिन्याला गर्भावस्थेच्या पहिली तिमाही म्हणतात .
गरोदरपणाचा चौथा महिना Fourth Month Of Pregnancy
चौथ्या महिन्यामध्ये थोडेसे पोट दिसायला सुरु होते. या दरम्यान बाळाचा आकार झपाट्याने वाढत असतो. मेंदूचा आणि हृदयाचा विकास जलद गतीने होतो. चौथ्या महिन्यात केल्या जाणाऱ्या सोनोग्राफीमध्ये बाळाच्या हृदयाचे थोडे अधिक स्पष्ट ऐकू येतात. चौथ्या महिन्यात गर्भात वाढणाऱ्या बाळाची ज्ञानेंद्रिये विकसित होत असतात, ज्यामूळे बाळाचा जन्म झाल्यानंतर ते पाहू, ऐकू , वास घेऊ शकेल. या दरम्यान बाळाला उचकीही लागते आणि गर्भवतीला पोटामध्ये ठोके पडल्यासारखे जाणवू शकते. गर्भावस्थेच्या चौथ्या महिन्यात गर्भाची हालचाल बऱ्याच प्रमाणात वाढलेली असते आणि गर्भवतीला ती हळू हळू जाणवू हि लागते.
गर्भावस्थेच्या चौथ्या महिन्यात गर्भाचा आकार साधारणपणे ६ इंच एवढा झालेला असते.
या दरम्यान पोटावर हात ठेऊन बाळाशी संवाद साधा ज्यामुळे बाळाची बौद्धिक आणि मानसिक वाढ उत्तम प्रकारे होते.
गरोदरपणाचा पाचवा महिना Fifth Month Of Pregnancy
पाचव्या महिन्यात आईला गर्भाची हालचाल अगदी प्रकर्षाने जाणवू लागते. बाळ पोटामध्ये लाथा मारतोय याचा अदभूत आनंद मातेला पहिल्यांदा मिळतो. पाचव्या महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या सोनोग्राफीमध्ये तुम्हाला बाळाचे सर्व अवयव अगदी स्पष्टपणे दिसतात. गर्भावस्थेच्या पाचव्या महिन्यात गर्भाशयातील बाळ लहानश्या अभ्रकाप्रमाणे दिसू लागते. त्याच्या भुवया, डोळे आणि पापण्या विकसित झालेल्या असतात, हिरड्यांखाली दात येत असतात आणि जिभेवरचे टेस्ट बड्स सुद्धा विकसित होतात. ज्यामुळे बाळाला जन्मानंतर वेगवेगळ्या चवी समजण्यास मदत होते.
गर्भावस्थेच्या पाचव्या महिन्यात गर्भाचा आकार साधारणपणे १० इंच एवढा झालेला असते.
गरोदरपणाचा सहावा महिना Sixth Month Of Pregnancy
गर्भावस्थेच्या सहाव्या महिन्यात गर्भाच्या आकारात आणि वजनात झपाट्याने वाढ होत असते. सहाव्या महिन्यात बाळाच्या डोळ्यांची उघडझाप होऊ लागते. सुरुवातीला बाळाला फक्त आईच्या शरीरातील आवाज जसे कि हृदयाचे ठोके ऐकू येतात आणि हळू हळू बाहेरील आवाजही ऐकू शकते. बाळाची श्रवणशक्ती विकसित झाल्याने बाळ आवाजाला प्रतिसाद देऊ लागते. बाळ त्याची बोटे किंवा अंगठा चोखू शकते. बाळाची त्वचा, रंगही या दरम्यान विकसित होतो.
गर्भावस्थेच्या सहाव्या महिन्यात गर्भाचा आकार १२ इंच एवढा झालेला असतो.
चौथ्या महिन्यापासून ते सहावा महिना पूर्ण होईपर्यंत गरोदरपणाच्या या प्रवासाला दुसरी तिमाही म्हणतात.
गरोदरपणाचा सातवा महिना Seventh Month Of Pregnancy
सातव्या महिन्यात बाळाच्या अवयवांची वाढ पूर्ण होते.असे असले तरीही या दरम्यान बाळ हा पूर्णतः जन्म घेण्यास तयार नसते. या काळात बाळ तुमच्या प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद देऊ लागते याशिवाय बाळाची हालचालही अतिवेगाने जाणवते. गर्भामध्ये बाळ फिरते आहे वाटू लागते.सातव्या महिन्यात बाळ प्रकाशाच्या दिशेने डोळे वळवू शकते. मोठा आवाज झाल्यास लाथ किंवा उडी मारू लागते. मंद, शांत गाणे किंवा संगीत ऐकवल्यास शांत होते.
गर्भावस्थेच्या सातव्या महिन्यात बाळाचे डोके गर्भाशयाच्या खालच्या दिशेला होते. सुखकर आणि नैसर्गिक पद्धतीने बाहेरच्या जगामध्ये येण्यासाठी हा बदल गरजेचं असतो.
गर्भावस्थेच्या सातव्या महिन्यात गर्भाचा आकार १४ इंच एवढा झालेला असतो.
गरोदरपणाचा आठवा महिना Eighth Month Of Pregnancy
गर्भावस्थेच्या आठव्या महिन्यात बाळाच्या पोटातील हालचाली थोड्याश्या मोठ्या प्रमाणात जाणवतील. बाळाचा वाढलेला आकार आणि वजन यामुळे गर्भाशयामध्ये दाटी झालेली असते त्यामुळे या हालचाली प्रखरपणे जाणवतात. या काळात बाळ हा जन्म घेण्यासाठी तयार होत असतो. डोके खालच्या दिशेला होऊन बाळ कटिभागात सरकले आहे असे तुम्हाला जाणवू लागते.
आठव्या महिन्यामध्ये बाळाचे हृदय, फुफ्फुसे आणि मेंदूची वाढ आणि विकास चांगल्या पद्धतीने होतो. या दरम्यान बाळाचा जन्म होण्याचीही शक्यता असते. परंतु बाळाच्या पूर्ण वाढीसाठी नऊ महिने पूर्ण करूनच जन्म घेणे आवश्यक असते म्हणूनच या दरम्यान आईने तिची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते.
गर्भावस्थेच्या आठव्या महिन्यात बाळाचा आकार जवळजवळ १८ इंच एवढा झालेला असतो.
गरोदरपणाचा नववा महिना अतिशय महत्वाचा असतो कारण या काळात बाळाचा कधीही जन्म होऊ शकतो. गर्भावस्थेच्या नवव्या महिन्यात बाळाच्या अंगावरचे केस गाळून पडतात तसेच बाळाच्या त्वचेवर मलईसारखे असणारे पांढरे आवरणही जाऊ लागते. बाळाच्या त्वचेखाली चरबीचा थर विकसित होतो ज्यामुळे बाळ जन्म झाल्यानंतर उबदार राहण्यास मदत होते. नवव्या महिन्यात बाळाचा आकार हा १८-२० इंच इतका झालेला असतो.
बाळाची वाढ आणि आईचे आरोग्य उत्तम असेल तर बाळाचा जन्म नैसर्गिक पद्धतीने होतो मात्र काही अडचणी असल्यास सिझेरियन पद्धतीने प्रसूती केली जाते. गर्भाची वाढ, आईचे आरोग्य आणि मनःस्थिती या सर्व गोष्टी लक्षात घेऊन प्रसूती कधी होणार आणि कशी होणार हे ठरवले जाते.
अधिक वाचा
गर्भावस्थेत ऍनिमिया होण्याची लक्षणे कारणे आणि उपचार(Anemia in Pregnancy) )